पावसाची विविध रूपे मराठी निबंध | Pavsachi Vividh Rupe Essay In Marathi

या पोस्ट मध्ये आपण पावसाची विविध रूपे मराठी निबंध / Pavsachi Vividh Rupe Essay In Marathi हे निबंध लेखन 100 ते  400 शब्दांमध्ये करणार आहोत

Pavsachi Vividh Rupe Essay In Marathi

Pavsachi Vividh Rupe Essay In Marathi

पावसाची विविध रूपे

( मुद्दे : पाऊस : निसर्गाची एक मुद्रा मला अत्यंत प्रिय पाऊस विविध रूपांत भेटलेला. धो धो कोसळणारा श्रावणातला रिमझिमणारा घाटमाथ्यावरील नि:शब्द पाऊस- प्रलयंकारी माणसाचा पोशिंदा.हवाहवासा वाटणारा.)

पाऊस म्हणजे निसर्गाची एक भावपूर्ण मुद्राच जणू! अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस माझा जिवाभावाचा सखाच बनला आहे. हा पाऊस मला अनेक रूपांत भेटला आहे.

पावसाळ्याचे दिवस होते. आभाळभर ढग जमा होत होते. भर दुपारी अंधारून आले. गार वारे जोरजोरात वाहू लागले… आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरू झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता.

घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावत होते. एखादया अवखळ, दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता. मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील होऊन मनसोक्त नाचत होती.

खरे तर, पावसाबरोबर मुले नाचत-खेळत होती की पाऊसच मुलांच्या आडदांड उत्साहात भिजत होता, हे सांगणे कठीण होते. श्रावणात मात्र मी वेगळाच पाऊस पाहिला.

तो आला तोच मुळी अलवारपणे रिमझिमत… अंगांगाला मृदुमुलायम स्पर्श करीत! अचानक दोन-चार सरी धरतीवर अलगद रिमझिमल्या आणि तेवढ्यात अदृश्यही झाल्या!

क्षणातच ऊन पसरू लागले. काही अवधीतच पुन्हा पावसाच्या सरी अवतरल्या आणि त्यापाठोपाठ ऊनही! ऊनपावसाचा जणू पाठशिवणीचा खेळ चालू होता. काही वेळा तर उन्हातच पाऊस रिमझिमला आणि चमचमणाऱ्या प्रकाशबिंदूंचा हळुवार वर्षावच स्वर्गातून पृथ्वीवर होत असल्याचा भास झाला.

त्याच वेळी एक अद्भुत स्वप्नवत दृश्य अवतरले. कोमल सप्तरंगांचे इंद्रधनुष्य अवकाशात तरळू लागले. एकदा आम्ही माथेरानच्या शिखरावर जणू ढगांतूनच हिंडत होतो. समोर पाच फुटांवरचेही काही दिसत नव्हते.

अवतीभवती धुके आणि फक्त धुकेच! त्या वेळीही पाऊस पडत होता. ढगाचे सूक्ष्म सूक्ष्म कण फटकन फुटत असल्यासारखा कट्कट्अ सा अत्यंत सूक्ष्म आवाज कानाला जाणवत होता. अंगाला पावसाचा स्पर्शही होत होता.

कपडे भिजत होते. पण तो डोळ्यांना दिसत मात्र नव्हता. म्हटले तर आहे आणि म्हटले तर नाही! असा आहे-नाहीच्या सीमारेषेवर रेंगाळणारा अद्भुत पाऊस! त्याच्या जन्मस्थळीचा, ढगातला! असा हा सुखावणारा, हवाहवासा वाटणारा पाऊस !

मात्र या सहृदयी पावसाने २५ जुलै २००५ रोजी अक्राळविक्राळ.रूप धारण केले होते. त्या आधी दोन दिवसांपासून तो धो धो कोसळत होता, कोसळतच होता. ढगांच्या प्रचंड गडगडाटामुळे त्याने तांडवनृत्यच सुरू केल्याचे जाणवत होते.

रस्ते, गल्ल्या, नदी-नाले ओसंडून वाहू लागले. तलाव भरून आजूबाजूच्या गावांत पसरले. धरणांच्या भिंती कोसळतात की काय, अशी भीती निर्माण झाली. शेकडो घरे पूर्णपणे वाहून गेली, शेकडो माणसे पाण्यातून वाहून गेली. हजारो जनावरांना जलसमाधी मिळाली.

मुंबईसारख्या शहरातही बैठी घरे अन् झोपड्या तर वाहून गेल्याच; पण मोठमोठ्या इमारतींमध्येही पहिल्या दुसऱ्या मजल्यांपर्यंत पाणी चढले होते. अक्षरश: हाहाकार माजला होता.

जणू काही जगबुडीच आली होती! पर्यावरणाच्या विध्वंसाचा जो हिंसाचार माणसाने मांडला आहे, त्याची अशी ही शिक्षा निसर्गाने दिली! असा हा पाऊस माणसाचा पोशिंदा, सुखदाता आणि कठोर शास्ताही! तो कसाही असला तरी मला प्रिय आहे.

जेव्हा जेव्हा तो भेटेल तेव्हा तेव्हा मी त्याच्यासोबतच राहीन. त्याला टाळून घरात बसून राहण्याचा करंटेपणा कधीही करणार नाही!

वरील निबंध खालील विषयांवर देखील

  • पावसांची विविध रुपे मराठी निबंध / Pavsachi Vividh Rupe Marathi Nibandh
  • पावसांची  रुपे मराठी निबंध लेखन / Pavsanchi Rupe Marathi Nibandh
  • पावसाची रुपे वर मराठी निबंध /  Types Of Rain Essay In Marathi

तुम्हाला पावसांची विविध रुपे मराठी निबंध / Essay On Pavsachi Vividh Rupe In Marathi हा निबंध नक्कीच आवडले असेल धन्यवाद,